Ad will apear here
Next
साहसी खेळांमधील सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शनासाठी ‘महा अॅडव्हेंचर कौन्सिल’
सहभागी व्यक्ती आणि पर्यावरण यांच्या सुरक्षिततेसाठी आयोजक संस्था, व्यक्तींना सर्वंकष मार्गदर्शन


पुणे :
साहसी क्रीडाप्रकारांचे आयोजन ही आता केवळ मोठ्या शहरांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. या खेळांचा प्रसार हळूहळू सर्वदूर होतो आहे; मात्र त्यातील दुर्घटनांमुळे होणारे मृत्यू आणि या खेळांमुळे पर्यावरणाला होणारी हानी हा चिंतेचा विषय होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरण आणि सहभागी व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन उत्कृष्ट आयोजन करण्याच्या दृष्टीने संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी महा अॅडव्हेंचर कौन्सिल या ‘ना नफा’ तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. साहसी खेळांशी संबंधित खेळाडू, तसेच संस्थांनी या संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 



१९७१पासून गिर्यारोहणासारख्या विविध साहसी खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले ‘आयआयटी’यन आणि लेखक वसंत वसंत लिमये हे या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. रत्नेश नीलरत्न जवेरी (सीईओ), दिलीप माधव लागू (सचिव), राजेंद्र मधुसूदन फडके (खजिनदार) हे संस्थेचे पदाधिकारी असून, दिव्येश मुनी, शंतनू पंडित आणि अभय प्रफुल्ल घाणेकर यांचा तज्ज्ञ समितीत समावेश आहे. या सर्व जणांना कोणत्या ना कोणत्या साहसी खेळाचा उत्तम अनुभव असून, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले, तरी साहसी खेळांबद्दल त्यांना विशेष ज्ञान आणि आवड आहे. 

या संस्थेबद्दल अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांनी सविस्तर माहिती दिली. ‘पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम होईल अशी काळजी घेऊन, जल, वायू आणि जमिनीवरील साहसी क्रीडाप्रकारांचे जबाबदार आयोजन करणे आणि सुरक्षित, साहसी वृत्तीस आणि उत्कृष्टता साध्य करणाऱ्या संस्कृतीस प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी मार्गदर्शक संस्था बनणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे त्यांनी सांगितले.  

‘वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी डोंगर, नद्या आणि आकाशात साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या शेकडो संस्था आज कार्यरत आहेत. साहस म्हटले, की त्यात अंगभूत धोका आणि अनिश्चितता हे ओघानेच आले. किंबहुना त्यामुळेच असे उपक्रम आयोजित करताना सहभागी सदस्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेणे हे आवश्यक ठरते,’ असे लिमये म्हणाले.

‘साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या अनेक संस्था सध्या कार्यरत असल्याने, घराबाहेर पडून साहसी क्रीडाप्रकारांचा आनंद लुटणे आता सर्वसामान्यांनाही सहज शक्य झाले आहे; पण अशा अनियंत्रित प्रसाराचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. तसेच पर्यावरण आणि काही प्रमाणात सांस्कृतिक हानीही होते आहे. हिमालयातील अति उंचीवर आयोजित केलेल्या अशाच एका पदभ्रमण मोहिमेत घडलेल्या दुर्दैवी घटनेत आपला मुलगा गमावल्यामुळे अत्यंत दु:खी झालेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात किंवा कमीत कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहितयाचिका न्यायालयात दाखल केली होती. सरकारने आजवर या संदर्भात जारी केलेले दोन वटहुकूम आणि या प्रक्रियेत साहसी उपक्रम आयोजकांचा वाढता सहभाग हा या याचिकेचा परिणाम. महा अॅडव्हेंचर कौन्सिलची (एमएसी) स्थापना ही याचीच पुढची पायरी आहे,’ असे लिमये यांनी सांगितले.  

‘सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या, त्यात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या, तसेच विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या, अशा सर्वांनाच आवश्यक ते मार्गदर्शक उपलब्ध करणे आणि संबंधित सरकारी खात्यांशी संवाद साधणे अशा विविध पातळ्यांवर ‘एमएसी’ने काम सुरू केले आहे,’ असेही लिमये यांनी नमूद केले.



विविध साहसी उपक्रमांत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती ‘एमएसी’च्या संस्थापक आणि हितचिंतक आहेत. मानके (स्टँडर्डस्) निर्माण करून ती राबवणे, संस्था चालवणे आणि प्रगतिपथावर नेणे या बाबतीतील अनुभवी व्यक्ती, तसेच धोकादायक परिस्थितीचे व्यवस्थापन आणि साहसी उपक्रमातील सुरक्षा यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केलेल्या तज्ज्ञ व्यक्ती ‘एमएसी’शी निगडित असल्याचे लिमये यांनी सांगितले.



‘साहसी वृत्तीची जोपासना करणे, अज्ञाताचा ठाव घेणे आणि हा आनंद वृद्धिंगत करतानाच आपल्या कार्यशैलीत सुरक्षितता बाणवणे ही ‘एमएसी’ची मुख्य उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करत असताना ‘सुरक्षा ‘हे कार्यशैलीचे एक अविभाज्य अंग व्हावे, यासाठी ‘एमएसी’ कार्य करील,’ असे त्यांनी विशद केले. 

‘एमएसी’ या पद्धतीने कार्य करणार

- सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून, संशोधनावर आधारित नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे. 
- अशी मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी विविध संस्थांमध्ये ताळमेळ साधणे. 
- धोक्याच्या व्यवस्थापनात सुसंवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 
- या क्षेत्रातील विविध घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचवणे. 
- आयोजक संस्था, सहभागी, त्यांचे कुटुंबीय आणि सरकार अशा विविध भागधारकांमध्ये साहचर्य वाढविणे आणि त्यांचा पाठिंबा मिळवणे. 
- साहसी क्रीडाप्रकारातील सुरक्षितता या संदर्भात सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करणे. 
- आयोजनातील सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देणे. 
- प्रसारमाध्यमे, चर्चा गट आणि सक्रिय सहभाग या माध्यमातून, सर्वसमावेशक पद्धतीने ‘एमएसी’ अधिकाधिक व्यक्त्ती आणि सदस्य संस्थांना या कार्यात सहभागी करून घेईल. 
- ना नफा संस्था आणि व्यावसायिक संस्था, तसेच कोणीही व्यक्ती ‘एमएसी’ची सदस्य बनू शकते. संस्थात्मक सदस्य ‘एमएसी’च्या कार्यप्रणालीत सहभागी होऊ शकतील. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
ई-मेल : mahaadventurecouncil@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZVFCC
Similar Posts
चक्रीवादळामुळे हानी झालेल्या सह्याद्रीच्या कुशीतील गावांना मदतीसाठी मोहीम नुकत्याच येऊन गेलेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे सह्याद्री पर्वताच्या कुशीतील, विशेषतः रायगड आणि पुणे जिल्ह्यातील, अनेक लहान गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये खूप हानी झाली आहे. उधेवाडी (राजमाची), एकोले, भांबुर्डे (घनगड), ठाकूरवाडी (प्रबळ माची), किल्ल्याची वाडी (माणिकगड) ही त्यातील काही गावे. अशा गावांना
धुंद-स्वच्छंद बाळ्या ‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लेखन अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करून त्यात उत्तुंग यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. त्या अवलियाचं नाव आहे वसंत वसंत लिमये. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’
उमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई पुणे : गिरिप्रेमी या प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या प्रमुख मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांनी ‘माउंट मेरा’ या नेपाळमधील सहा हजार ४७६ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांनी ही चढाई एकट्याने (सोलो) केली. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झिरपे ‘माउंट मेरा’ शिखरावर पोहोचले.
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language